वाळवी
मन भासते जणू वाळवी समान,
पोखरते आतून अन् विसरते भान,
सतत अपयाशाचा डोक्याला ह्या ताण,
मार्ग होईल सोपा जणू देऊनी हे प्राण.
प्राण मनुष्याचा पुण्याने मिळे रे क्वचित्,
एकटेपणा तुला नाही सोडेल अवचित,
पाप-पुण्याचे तुझे आहे रे संचित,
दावणीला बांधून स्थिर ठेव तुझे चित्त.
चित्तथरारक दिसे काळोख अमावस्येचा,
आठवतो तो दिवस जुना मज तपस्येचा,
तूच बंधू गड्या तूच होशी वैरी स्वतःचा,
मनाला ना दिसे झोत कुठेही प्रकाशाचा.
जीवन म्हणजे गोंधळं, एक संघर्षाचं खळं,
दुष्काळात फुलालाही, आज येईना परिमळ,
तुझ्या अंतरलढाईला, मिळेना कुठूनही बळ,
मार्ग चुकून आतातरी तू पंढरीच्या मार्गी वळ.
नश्वर हे शरीर तुझं त्याग करू म्हणतोस का?
आत्म्याला शांती प्राप्तीची शाश्वती देतोस का?
ह्या जन्मी न लढता, भ्याडापरी भितोस का?
कर्णाच्या आयुष्यातून, हिम्मत थोडी घेतोस का?
अनाहूत
२१ - ०२ - २०२४,
दु. ४:४०.
संदर्भ: सामाजिक दबाव आणि अभ्यास किंवा नोकरी इत्यादींच्या कामादरम्यान मनात येणारे नकारात्मक भावनांचे तुफान ह्या कवितेत दर्शवण्याचा छोटासा प्रयत्न. प्रत्येक नकारात्मक विचार हे कुठून तरी ट्रिगर होत असतात आणि बऱ्याच वेळा ट्रिगर माहीत असून देखील आपण असे फसलेलो असतो की जसा अभिमन्यु चक्रव्यूहात. मग तेव्हा आपल्याला समोर फक्त दोन मार्ग दिसतात एक म्हणजे समोर येणाऱ्या शत्रूंचा सर्व शक्ती एकवटून प्रतिकार करणे आणि शक्य तेवढ्यांना शह देऊन मरणे अथवा विना लढता मरणे. आपल्याला सतत आपल्या समस्या आणि दुःखापुढे सगळं काही क्षुल्लक दिसायला लागतं अशावेळी दोन गोष्टींचा विचार करावा:
१. कर्णाला आपला अंत सुरुवातीपासून ठाऊक होता, सूर्याने स्वतः त्याला इंद्रदेवाच्या कारस्थानी मनसुब्याची खबर दिली होती तरीही त्याने आपला दानधर्म सोडला नाही. आयुष्यभर अपमान अन् योग्यता असूनदेखील अपयश त्याच्या पाचवीला पुजलेले होते. मृत्यूच्या भीतीने अथवा स्वार्थी वा भ्याड विचारांनी त्याने माघार घेतली नाही. अशा कर्णाच्या भारतदेशात जन्मलेल्या मुलांनी असे आत्मघातकी विचार आले तर फक्त त्याचा आदर्श आठवावा आणि आपला धर्म पाळण्याचा मार्ग प्रशस्त करावा.
२. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ।। श्रीमद्भगवद्गीता 18.14।।
अर्थात् "यामध्ये (क्रिया सिद्धी, मेहनत), स्थान (मानवी शरीर किंवा भौतिक वातावरण), आणि कर्ता (आपण स्वतः), तसेच अनेक प्रकारची साधने (बाह्य आणि अंतर्बाह्य) आणि विविध प्रकारच्या विविध क्रिया (पद्धत) आणि पाचवा घटक जो नियती म्हणजेच दैव सामील आहे." सर्वप्रथम कष्ट करावे, मग पात्रता प्राप्त होईल, मग माध्यम निवडावे, मग नाना प्रकारची पध्दत अवलंबून शेवटी दैवावर सोडून आपण निःस्वार्थपणे निष्काम कर्म करावे. श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे ह्या पाच मार्गाने मार्गक्रमण करून शेवटी पांडुरंग परमेश्वरावर विश्वासाने आपल्या कर्मरुपी भक्तीचा अभिषेक करावा.
वाचण्याबद्दला मनपूर्वक आभार 🙏
जय श्री कृष्ण!
Comments
Post a Comment