साऱ्या गावात... बाराच्या भावात...
साऱ्या गावात... बाराच्या भावात...
भेटलो पांथस्थास चालता चालता
निघालो दोघेही स्वतः च्या शोधात
थोड्या वेळाने जोमात, थोड्या वेळाने कोमात
पाऊले टाकली सुखदुःख सावडत…
भरकटलेला मी जरा सावध सावध
मनातील वादळाने पडलो कोड्यात
देव दैव झाले, झाले फकीर धुंडून
नाही मनी समाधान गेलो साऱ्या गावात…
बसलो म्हाताऱ्याच्या पडक्या घरात
बोलूनच माझी त्याने काढली वरात
सल्ला दिला त्याने एकाच वाक्यात
म्हणे, पडू नको पालथा उद्याच्या दारात…
एकदम भिडली बात माझ्या काळजात
दोघेही म्हणालो मग एका तालासुरात
चिंतेच्या चितेत नाहकच उतरतो, ज्याने
आज निघून जाईल बाराच्या भावात…
अनवाणी फिरतो प्रकाशाच्या वेधात
एकलाच वेडा जणू तू या जगात
आतल्या उत्साहाला जागा कर वेड्या
एक मशाल पेटेल तुझ्याही मनात…
अनाहूत
७ जानेवारी २०२३
००:१४
Comments
Post a Comment