मराठी गझल - ... खंत नव्हे
खंत नव्हे
जे व्हायचे ते होऊनी गेले खंत नव्हे
बोलायचे ते राहूनी गेले खंत नव्हे ||ध्रु.||
खट्याळ अवखळ बालपण ते आनंदी
खोड्या करणे राहुनी गेले खंत नव्हे
दप्तराच्या ओझ्याखाली दबलेला तो
कायमचाच तो दबून गेला खंत नव्हे
झिम्मा-फुगडी, विटीदांडूचा खेळच न्यारा
अर्ध्यावरती सोडूनी गेले खंत नव्हे
ओझे अपेक्षांचे आता वाढत होते
निराशा हाती लागूनही खंत नव्हे
स्पर्धांच्या त्या किती-एक केल्या शिकवण्या
शिकण्याचे जरी राहुनी गेले खंत नव्हे
साथ होती तव मजला देखील सवंगड्यांची
मित्रांचे त्या हातच सुटले खंत नव्हे
नवीन स्वप्ने, नवीन आशा, पहिले प्रेम
बघता बघता अंधुक झाले खंत नव्हे
प्रसन्न आणि निवांत जगणे क्वचित् मिळते
रोजचे चांदणेच हरवले खंत नव्हे
आत्मघातकी हल्ल्यांचेही वादळ वाढे
विद्यार्थ्यांच्या अश्रूचीही खंत नव्हे
ज्ञानसाधना, समाजसेवा, विकास, प्रगती
लेखांपुरते शीर्षक झाले खंत नव्हे
वाढत होते राजकारणी, वैभिचारीही
धर्माच्या मुळावर उठले खंत नव्हे
नकारात्मकतेच्या भावनांचे तुफान उठले
माणुसकी परि थोडी शिल्लक खंत नव्हे
लिहायचे ते नेमकेच पण राहुनी गेले
तरी कळणाऱ्यांना कळून चुकले खंत नव्हे
- अनाहूत
२८ सप्टेंबर २०१७
टंकलेखन - २२ जुलै २०२२, २२:२२.
Comments
Post a Comment